Wednesday, June 17, 2009

केकावलि



कविवर्य
मोरोपंत विरचित
केकावलि
सदाश्रितपदा ! सदाशिवमनोविनोदास्पदा !
स्वदासवशमानसा ! कलिमलांतका ! कामदा !
वदान्यजनसद्गुरो ! प्रशमितामितासन्मदा !
गदारिदरनंदकांबुजधरा ! नमस्ते सदा.। । १ । ।

अर्थ : साधुसंत ज्याच्या पायाचा आसरा घेतात,
शंकराच्या मनाला ज्याच्या ठायीं आराम लाभतो,
ज्याचें मन आपल्या भक्ताच्या अंकित असतें,
जो दुर्बुद्धींतील पापाचा ठाव पुसून टाकितो व सर्व
इच्छा पुरवितो, जो सर्व उदार महात्म्यांचा दीक्षागुरुच-
-श्रेष्ठ आचार्यच- आहे, असंख्य दुष्टांचा माज ज्यानें
झाडून टाकिला आहे, आणि जो गदा, चक्र, शंख,
नंदकखड्ग व कमल, हीं आयुधें धारण करितो, त्या
नारायणस्वरुपी परमेश्र्वरा, मी तुला निरंतर नमन करितों.

पदाब्जरज जें तुझें सकलपावनाधार तें;
अघाचलहि तारिले बहु तुवांचि राधारतें;
अजामिळ, अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगळा,
अशां गति दिली ; उरे तृण भेटतां इंगळा. । । । ।

अर्थ: तुलाच निरंतर नमन करण्याचें कारण असें कीं, पापपंक
धूऊन टाकणाय्रा जगांतील सर्व वस्तूंच्या शुध्दिसामर्थ्याचें
मूळ म्हणजे तुझ्या पायाच्या धुळीचा कण; हे राधारमणा,
पापाचे केवळ डोंगरच अशा अघोरांचेंही तारण तूंच केलें
आहेस॰ दुराचारी अजामिळ, अत्याचारी अघदैत्य, अज्ञान
वासनावश गोपी, कपटी पूतना, वेश्या पिंगळा, अशांसारख्या
पातक्यांनाही तूं मोक्षपदास चढविलेंस; आणि खरेंच, तुझी
संगति घडल्याबरोबर त्यांचें पाप साफ़ नाहींसें होऊन
त्यांनीं मोक्षपदास पात्र व्हावें हेंच स्वाभाविक आहे॰ अग्नीशीं
गांठीभेटी झाल्यावर गवत टिकणें शक्यच नाहीं, तें जळून
खाक होणारच.
तुझ्या बहुत शोधिले अघनिधी पदाच्या रजें;
न तें अनृत वर्णिती बुध जनीं सदाचार जें; ।
असें सतत बोलते शत,
एक ते; मीच ते
प्रमाण म्हणों जरी, उचित माझिया नीचते. । । । ।
अर्थ: हे प्रभो, पापाचे केवळ सागरच, असे किती तरी दुराचारी
तुझ्या पायाच्या धूळीकणानें शुध्द केलेले आहेत, असें जें
शहाणेसुर्ते शुध्दवर्तनी लोक सांगतात, तें खास खोटे नाहीं॰
शिवाय असें नेहमीं सांगणारे एकदोन नाहींत, तर
शेंकडों आहेत॰ मग मी एकट्यानेंच त्यांना अप्रमाण बेभरंवशीक
म्हटलें, तर त्यानें उलट माझाच हलकेपणा सिध्द होईल.
तसाचि उरलों कसा? पतित मी नसें काय? कीं
कृपाचि सरली? असेंहि घडे जगन्नायकीं. ।
नसेन दिसलों कसा? नयन सर्वसाक्षी रवी
विषाद धरिला॰ म्हणों? सुरभी विष, क्षीर वी. । । । ।
अर्थ: मग, अशा प्रकारें मी तुला सतत शरण आलों असतां,
आणि महान् महान् पापीही तुझ्या प्रसादानें निष्पाप
होऊन परमपद पावले, हें निश्चित असतां, मी मात्र
पूर्वींप्रमाणेंच अद्यापही उपेक्षा केलेला-हेळसांडलेला-कसा
राहिलों आहें? का, मी मुळीं पापीच नाहीं? किंवा मी पापी
असून तुमच्या जवळचा कळवळ्याचा सांठाच पतितांचें
तारण करितां करितां संपून गेला? पण, तुम्ही विश्वाची
काळजी वाहणारे परमेश आहां, तेव्हां तुमच्या करुणेला
अंत असणें शक्यच नाहीं. कदाचित् मी अद्याप तुमच्या
नजरेच्या टप्प्यांत आलों नसेन, असा तर्क बांधावा, तर
तोही जुळत नाहीं, कां कीं, ज्याची दृष्ठि चुकवून कांहींच
गुप्त राहूं शकत नाहीं, असा प्रत्यक्ष सूर्यच तुमचा डोळा
आहे. बरें, तुम्हीं मजवर माझ्या असंख्य अपराधांमुळें
रोष केला आहे, असें म्हणावें, तर, गाय कितीही चिडली,
तरी तिच्या ओटींतून दूधच निघतें, त्याचप्रमाणें तुमच्या
दयामय प्रकृतींतूनही रोषाची उत्पत्ति संभवत नाहीं.

व्रजावन करावया वसविलें नखाग्रीं धरा,
सलील तइं मंदराख्यहि नग स्व-पृष्ठीं धरा,
वराहतनु घेउनी उचलिली रदाग्रें धरा,
सुदुर्धर तुम्हां कसा पतित हा? कां उध्दरा? । । । ।

अर्थ: मी पापभारानें इतका अवजड बोजा झालों आहें,
कीं, मला उध्दरणें तुम्हांला शक्य नाहीं, असें म्हणावें,
तर तुमचे अचाट पराक्रम पुराणांत कसे वर्णिलेले आहेत,
तें पहा. वृंदावनांतील गोकुळाचें संरक्षण करण्यासाठीं तुम्हीं
प्रत्यक्ष गोवर्धन डोंगर आपल्या नखाच्या टोंकावर तोलून
धरिला. समुद्रमंथनाच्या त्या पुराणप्रसिध्द प्रसंगीं मंदरपर्वत
आपल्या पाठीवर सहजासहजी वागविलात. वराहअवतार
धारण करून तुम्हीं दैत्यांनीं पाताळीं चेपलेली पृथ्वी आपल्या
सुळ्याच्या बोंथीनें वर काढलीत. मग अशा तुम्हांलाही झेंपणार
नाहीं, इतका पापभारानें जड मी होणार तरी कसा? जर इतका
जड होणें शक्यच नाहीं, तर मग, माझें तारण कां करीत नाहीं?
हा प्रश्न राहतोच.
कै. बा॰ अ॰ भिडे संपादीत
सुबोध केकावलि