Thursday, August 27, 2009

केकावलि २६ ते ३०


केकावलि २६ ते ३०
जनीं तरि असें असे, शिशुहि जे मुखें वर्ण वी ,
पिता पिउनी ते भुले , मधुरता सुखें वर्णवी ;
मना जरि ये , गुरुक्तहि म्हणे ' कटु ' प्रायशा ;
दयानिधि ! तुम्हांपुढें जनकथा अशा कायशा ?

अर्थ
: लोकांत सामान्यत: असा प्रकार आढळतो , कीं ,
लहान मूलसुद्धां तोंडानें जीं बाबा , मामा , पापा इत्यादि
बोबडीं वेडींवांकडीं अक्षरें उच्चारितें , तीं मोठ्या
उत्सुकतेनें ऐकून बाप मोहून जातो , त्या अर्धवट
अक्षरांच्या गोडीचें कौतुक इतरांकडूनही आनंदानें करवितो !
उलट पक्षीं असा चमत्कार आढळतो , कीं, प्रत्यक्ष वडिलांचें
बोलणेंही जर आपल्या मनाला रुचलें नाहीं, तर मुलगा
त्या वडिलांच्या बोलण्याला कडू म्हणण्यासही बहुतकरुन
मागेंपुढें पाहत नाहीं ! एकंदरींत, माणसांच्या आवडी-नावडीचा
प्रकार असा आहे॰ परंतु, हे दयासागरा नारायणा , या सामान्य
लोकांच्या कथांची तुमच्यापुढें काय किंमत आहे॰? त्यांना
काडीचीही किंमत नाहीं, कारण त्या तुम्हांला मुळींच
लागू नाहींत.

अतर्क्य महिमा तुझा, गुणहि फार, 'बा, हें विधी।
श्रुतिज्ञहि म्हणे सदा, स्तविल आमुची केंवि धी? ।
तरी जन यथामति स्तवुनि जाहले सन्मती;
स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधीं जन्मती? २७

अर्थ: हे सख्या नारायणा, 'तुझा मोठेपणा अचिंत्य अगाध आहे,
तुझे गुण असंख्य आहेत, ' असें वेदाचें मर्म जाणणारा ब्रह्मदेवही
म्हणतो; मग आम्हां मानवांची कोती बोबडी वाणी
त्या महिम्याची त्या गुणांची यथास्थित स्तुति
कशी करणार? परंतु भाविक लोक आपल्या बुद्धिसामर्थ्यानुसार
बरींवाईट स्तोत्रे रचून, आपल्या मनाची तळमळ शांतवून,
शुद्ध होतात. तुमच्या महिम्यांच्या गुणांच्या यथार्थ स्तुति गुंफ़ण्याकरितां,
महिम्यांत गुणांत अगदीं तुमच्याच तोलाचे कवि
कधीं बरें जन्मास येतील? कधींच नाहीं, कारण मानव
जोंपर्यंत मानव आहे, तोंपर्यंत परमेश्र्वराचें पूर्णत्व
त्याच्या अंगीं येणार तरी कसें? कवि कितीही प्रतिभासंपन्न
झाला, तरी त्याची प्रतिभा तुमच्या समग्र महिम्याला गुणांना
आकळूंच शकणार नाहीं. तेव्हां आम्हां हीनगुण मानवांच्या
तोंडून आपली पूर्ण यथार्थ स्तुति झाली पाहिजे, अशी
आपण अपेक्षाच करुं नका.

निजस्तुती तुम्हां रुचे; स्तविति त्यां वरें तर्पितां,
नमस्कृतिपरां बरें स्वधन सर्वही अर्पितां ;
स्वभाव तुमचा असा विदित जाहला याचकां;
करूं स्तव जसातसा; फ़ळ नव्हे जना याच कां?

अर्थ: तुम्हांला भक्तांनीं भोळ्या भावानें केलेली आपली स्तुति
आवडते, आणि अशी स्तुति करणाय्रांना तुम्ही वर
देऊन संतुष्ट करितां, नम्र झालेल्या दासांना आपलें
सर्वस्वही देऊन टाकितां. हा तुमचा उदार स्वभाव
आमच्यासारख्या सर्व मागणेकय्रांमध्ये जगजाहीर
झाला आहे. म्हणून तर आम्ही जशीं साधतील, तशीं
तुमचीं स्तोत्रें गात असतों. मग इतरांच्या कशाबशा
स्तुतींनीं प्रसन्न होऊन जर तुम्हीं त्यांच्यावर कृपा
केलीत, तर या मलाच मात्र मी केलेल्या यथामति
स्तुतीचें फ़ळ कां मिळूं नये?

तुम्ही परम चांगले बहुसमर्थ दाते असे;
सुदीन जन मी तुम्हां शरण आजि आलों असें;
पुन्हाहि कथितों बरें श्रवण हें करायास्तव;
समक्ष किति आपला, सकललोकराया! स्तव? २९

अर्थ: देवा, तुम्हीं, मीं आतांच सांगितल्याप्रमाणें,
अतिशय गोड स्वभावाचे फार श्रीमंत दाते आहां;
मी, एक अत्यंत गरीब अनाथ जीव, तुम्हांला
श्ररण आलेला आहें. हें तुम्हीं चांगलें ऐकून घ्यावें,
म्हणून एकदां सांगितलें असतां पुन्हाही सांगत आहें
हे ब्रह्माण्डनायका ! याच्याहून अधिक स्तुति मी तुमच्याच
तोंडावर काय करावी?

किती श्रवण झांकिती प्रभुहि, काय ते पोळती!
पुसाल जरि ' कोण? ' ते पदरजीं तुझ्या लोळती;
बरें तुजचि सोसवे स्तवन, कृत्तिवासा गरा
पी तरि कसें घडे? हितकरा, दयासागरा! ३०

अर्थ: तुमच्या तोंडावर तुमची अधिक स्तुति करण्याला
मी ज़रा कचरतों, कारण अशी स्तुति केली असतां
कांहीं खरोखर मोठ्या योग्यतेचे पुरुषसुद्धां ती स्तुति
ऐकूं येऊं नये म्हणून हातांनीं आपले कान झांकून
घेतात, जणूं काय त्या स्तोत्रानें ते होरपळूनच जातात !
तुम्ही कदाचित् विचाराल, कीं, ' असे कोण? ' तर मी सांगतों,
कीं, ते तुमच्याच पायधुळींत लोळतात, अहो, ते
तुमचेच संतभक्त आहेत. परंतु आमचें एक मोठेंच सुदैव,
कीं, तुम्हांला तरी तोंडावर केलेली स्तुति आवडते, कारण
तुम्हांलाही जर ती आवडली नसती, तर मग
या स्तुतीची वाट काय झाली असती, आणि पापी
जनांचा उद्धार तरी कसा झाला असता? अहो, विश्र्वकल्याणकरा,
नारायणा, जगताला जाळून टाकणारें हलाहल विष,
जर शंकर पिणार नाहीं, तर काय भयंकर परिणाम होईल बरें?

सुबोध केकावलि
संपादक कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव भिकाजी ढवळे, प्रकाशन