Tuesday, September 29, 2009

केकावलि ३१ ते ३५


केकावलि ३१ ते ३५

गमो मधुर हें विष ' स्तवन, ' सेवितां माजवी,
करी मलिन सद्यशोमुख, हलाहला लाजवी;
हरापरिस तूं बरा, प्रभुवरा, सदा जो पिशी
असा
रस, समर्पित्या अमृत आपुलें ओपिशी. ३१
अर्थ
: हें ' स्तवन ' नांवाचें विष कानानें पितांना जरी गोड
लागलें
, तरी तें प्याल्याबरोबर मद उत्पन्न करितें,
सत्कीर्तीच्या
तोंडाला काळोखी फ़ांसतें, आणि
आपल्या
घातक गुणांनीं शंकराने पचविलेल्या भयंकर
हलाहल
विषालाही खालीं पाहावयास लावतें;
म्हणून, हे नारायणा, अशा या ' स्तवन ' नांवाच्या अद्भुत
विषाला
नेहमीं पिऊन टाकणारा तूं त्या शंकरापेक्षांही समर्थ खरा ;
आणि
विशेष चमत्कार हा, कीं, जो कोणी तुला हा असला
स्तवनरस
अर्पण करितो, त्याला तूं याच्या मोबदल्यांत
आपल्या
संग्रहींचें अमृत, सुधारस, पक्षीं मोक्ष देतोस !

कवीश्र्वरमनः
पयोनिधिसुता स्तुतीच्या पते !
भले
वरिती स्तुतीप्रति, जोडिती पाप ते,
गळां पडति ज्यांचिया तव गुणैकदेशभ्रमें,
तिंहीं
तुजचि दावितां, भजति, बा, तुला संभ्रमें. ३२

अर्थ: क्षीरसागरांतूं उपजलेल्या लक्ष्मीचा जसा तूं पति
आहेस
, तासाचा कविवर्यांच्या मनांतून उपजलेल्या
स्तुतीचाही
पति असणार्या परमेश्र्वरा, सज्जन साधुसंत या
स्तुतीचाही
स्वीकार करीत नाहींत; कारण, तसें करण्यांत पाप आहे,
आणि ते कधींही पापाचरण करीत नाहींत. देवा,
साधुसंतांच्या अंगीं दयाक्षमाशांति इत्यादि कांहीं गुण
हुबेहूब
तुमच्या गुणांसारखे असल्यामुळें साधुसंत म्हणजे
तुम्हीच
असा भास उत्पन्न होऊन, ही स्तुति ज्या साधुसंतांना
गळां मिठी घालायला जाते, त्यांनीं तुझ्याकडे बोट दाखविल्यावर
मात्र
आपल्या विलक्षण चुकीनें शरमून घाईघाईनें ती तुझ्या
सेवेला
लागते

म्हणोनि कवितासुता तुज समर्पितो साजरी; ।
नसे
बहुतशी गुणी, कनकपीतवासा ! जरी, ।
तरी इतरा वरी; हरि ! करीं इला किंकरी,
मयूरहि निजात्मजाग्रहविमुक्त, जैसा करी.॥ ३३ । ।

अर्थ: या कारणास्तव मी आपली ही सजविलेली कवितारूपी
मुलगी
तुला अर्पण करीत आहें. हे पीतांबरधारी, वैभवसंपन्न देवा,
हिच्या
अंगीं फारसे गुण नाहींत, तरी ही दुसर्या कोणालाही वरण्याचे
कबूल
करीत नाहीं; म्हणून, हे हरे, तूं हिला आपली दासी कर,
आणि
त्या प्रसिद्ध गजेन्द्र नांवाच्या हत्तीला जसा तूं मगरापासून
मुक्त केलास, तसा मला मोरोपंतालाही या मुलीच्या तुलाच वरण्याच्या
आग्रहापासून
मुक्त कर.

स्मरोनि
कृत मंतुला, कवितावधूस्वीकृती
कराल, तरि आयका, प्रभु, खराच मी दुष्कृती, ।
नमस्कृतिपुरःसर स्वकृति अर्पितों आजी ती, ।
दिली रविसखें तुम्हां जशि नमोनि सत्राजिती । । ३४ । ।

अर्थ: मी केलेल्या अपराधाची आठवण ठेवून, जर तुम्ही या
कवितासुतेचा
स्वीकार करण्याचें नाकारीत असाल, तर मी
काय म्हणतों तें देवा, ऐकून घ्या. मी दुष्ट अपराधी तर खराच,
पण
जशी तुमचा अपराध करणार्या सूर्यमित्र सत्राजितानें
मोठ्या
नम्र भावानें तुम्हांला आपली मुलगी सत्यभामा अर्पण केली,
त्याप्रमाणेंच मीही हात जोडून नमस्कारपूर्वक ती
आपली
कविताकन्या तुम्हांस समर्पीत आहें.

"
पिता खळ, परंतु ती गुणवती सती चांगली, ।
म्हणोनि
मज आपुल्या भजनिं लावणें लागली; " ।
म्हणाल
, तरी तत्सुता कशि? तुम्हांसवें भांडगा
अहर्निशिंहि
भांडला त्रिणवरात्र जो दांडगा.। । ३५ । ।

अर्थ: पण, देवा, तुम्ही म्हणाल, कीं, " बाप, सत्राजित दुष्ट होता,
परंतु
त्याची मुलगी सत्यभामा ही गुणी, सद्वर्तनी, भली होती,
म्हणून तिचा स्वीकार करून तिला स्वतःच्या सेवेला लावणें
अवश्य
झालें." यावर मी विचारतों कीं, सत्यभामेची एक गोष्ट
बाजूस
ठेवा, पण जो भांडखोर, हट्टी, धटिंगण तुमच्याबरोबर सत्तावीस
दिवस
अहोरात्र झगडला, त्या जांबुवंत आस्वलाची मुलगी, जी तुम्ही
वरलीत
ती कशी होती; तें सांगा पाहूं? त्या धसाड्या आस्वलाची
ती झिपर्यावाली आस्वली जर तुम्हीं स्वीकारलीत,
तर
या नम्र झालेल्या गरीबाची नीटस कविताकन्या
तुम्हांला
कोणत्या तोंडानें नाकारितां येईल?



सुबोध केकावलि
संपादक कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव भिकाजी ढवळे, प्रकाशन