Tuesday, September 29, 2009

केकावलि ३६ ते ४०


केकावलि ३६ ते ४०

तिलाही बरवी म्हणां, उचित होय, तोषाकरें; ।
असेल सजली यथारुचि तयीं स्वयोषा करें;
जशी पदरजें शिला; परि असे हे शापिली
धवें
, हरिमनोहराकृति सती अघें व्यापिली.


अर्थ: परंतु कदाचित् त्या जांबवतीला तुम्ही ' चांगली ' म्हणाल,
आणि
तें योग्यच म्हणावें लागेल, कारण, ती जांबवती
पदरांत घेतल्यावर तुम्हीं तिला आपल्या आनंदाची खाणच
अशा
कुशल हातानें पाहिजे तशी आपली स्त्री म्हणून
सजविली
असेल; असें अद्भुत कसब तुमच्या अंगी आहे
उदाहरणार्थ, दगडाच्या धोंडीची तुम्ही आपल्या
पायधुळीच्या स्पर्शानें अत्यंत लावण्यवती स्त्री बनविलीत. परंतु
ज्या
शिलारुप झालेल्या अहल्येचा तुम्हीं उद्धार केला, त्या
अहल्येपेक्षां
माझी कवितासुता किती तरी चांगली आहे!
ती
अहल्या जशी पतीनें शापलेली होती, तशी ही माझी
कृति कांहीं शापग्रस्त झालेली नाहीं; आणि जशी
अहल्या हरीला ( इंद्राला ) मोह पडेल इतकी लावण्यवती होती
तिची गणना सतीच्या ( पतिव्रतांच्या ) मालिकेंत होते,
तशीच
माझी कृतीही हरीला मोह पडेल इतक्या सुंदर
जडणीची
आहे, तिची गणनाही सतींच्या ( शुद्ध रचनांच्या )
मालिकेंत, होते, तरी पण त्या अहल्येंत माझ्या कृतींत एक
मोठाच
फरक आहे, तो हा कीं माझी कृति अहल्येप्रमाणें
पापदोषानें
लडबडलेली नाहीं.


भलें स्मरण जाहलें समयिं; कंसदासी करें
कशी
उजरली, समुज्ज्वलदयासुधासीकरें ?
तुम्हां
स्वरिपुची तशी बटिक आवडे, सत्कृती
नको, सजवे, असा बहुत काय मी दुष्कृती ?



अर्थ
: महाराज, मला आणखी एका प्रसंगाचें छान वेळेवरच स्मरण झालें
आहे
. निर्मल दयामृताचे कण ज्यांत आहेत अशा आपल्या हातानें
तुम्ही
ती कंसाची दासी कुब्जा, शरीरानें नीटस कशी बरें केलीत?
आपल्या
शत्रूची तसली कुबडी दासीही तुम्हांला आवडते, आणि माझी
काव्यकृति
मात्र आवडूं नये, तिला मात्र तुम्ही सजवूं नये,
गोड
करून घेऊं नये, इतका का मी पापी आहें?



जशी पृथुकतंदुलप्रसृति, आप्तकामा तशी
रुचो
कृति ; सभाग्य तूं सुनय आप्त कां मातशी?
कण्या विदुरमंदिरीं म्हणति साधु आस्वादिल्या;
खरें जरि, कशा तुज प्रभुसि आपुल्या स्वा दिल्या.


अर्थ: ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशा तुला
सर्वेश्र्वर्य
संपन्न परमेश्र्वराला जशी ( त्या सुदाम्याच्या ) पोह्यांच्या
कण्यांची
मूठ आवडली, तशीच ही माझी कविताकृतीही आवडो
आणि ही हीनगुण असली तरी तुला आवडणारच, कारण,
तूं
जरी श्रीमंत असलास, तरी चांगल्या चालीचा आम्हां भक्तांचा
सगासोयरा
आहेस, मग असा माजोरी उद्धटपणा तूं आमच्याशीं
कसा दाखवशील? असें सांगतात, कीं, विदुराच्या घरीं तुम्हीं
कण्यांवर ताव दिलात, हें जर खरें तर त्या विदुरानें तरी,
जो
आपला केवळ आत्माच अशा तुला प्रभूला
त्या
कण्या कशा दिल्या बरें?



जिणें रस पहावया प्रशिथिलीं रदीं चाविलीं,
सुवासहि कळावया प्रथम नासिकीं लाविलीं,
तुम्हांसि
शबरी तशीं बदरिकाफ़ळें दे; जुनी
कथा
अशि असो, पहा स्वचरितें तुम्ही मेजुनी.



अर्थ: ज्या शबरीनें बोरांची गोडी पाहण्याकरितां तीं आपल्या
म्हातारपणामुळें
हालणार्या दांतांनीं चावून पाहिलीं आणि
त्यांना
चांगला वास येत आहे कीं नाहीं हें जाणण्याकरितां तीं
नाकाला
लावून हुंगलीं, ती शबरी तसलीं बोरें तुम्हांला
अर्पण
करिती झाली, आणि तुम्हीं तीं आवडीनें चाखलींतही,
पण ही जुनी गोष्ट आतां पुरे झाली. तुम्हीच आपल्या चरित्राचें
सिंहावलोकन
करुन पाहा, म्हणजे असले दाखले
किती
तरी आढळतील.



प्रभो
! शरण आलियावरि व्हां कधीं वांकडे,
म्हणोनी इतुकेचि हें स्वहितकृत्य जीवांकडे; ।
प्रसाद करितां नसे पळ विलंब, बापा, खरें; ।
घनांबु पडे मुखीं उघडिल्याविना पांखरें. ।। । ।



अर्थ
: हे प्रभुराया, तुम्हांला कोणीही भक्त एकदा नम्र भावानें
शरण आला, म्हणजे तुम्ही त्याला कधींही प्रतिकूळ होत
नाहीं
. तेव्हां आम्हां मानवानीं आपल्या कल्याणाचें कृत्य करावयाचें
म्हणजे
तुम्हांला नम्र भावानें शरण यावयाचें, इतकेंच होय
कोणावरही
कृपा करण्याला तुम्हांला पळाचाहीं अवकाश
लागत
नाहीं, ही गोष्ट खरी, परंतु चातक पक्ष्यानें जर आपली
चोंचच
उघडली नाहीं, तर तींत पावसाचें पाणी पडणार नाहींच
त्याप्रमाणेंच तुम्हीं दयाळू दाते आहां कृपा करण्यास तुम्हांला
एका
निमिषाचाही अवकाश लागत नाहीं, हें जरी सर्व खरें आहे, तरी
तुमचा कृपायोग घडण्याला, आम्हीं आधीं तुम्हांला शरण आलेंच
पाहिजे, त्यावांचून कांहींच होणार नाहीं.


सुबोध केकावलि
कविवर्य मोरोपंतविरचित
संपादक कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव भिकाजी ढवळे, प्रकाशन