Wednesday, July 8, 2009

केकावलि ६ ते १०


केकावलि ६ ते १०
नतावनधृतव्रता ! ज्वलन तूंचि बाधावनीं,
पदप्रणतसंकटीं प्रजव तूंचि, बा धावनीं;
दया प्रकट दाखवी कवण, सांग, त्या वारणीं,
सतीव्यसनवारणीं, जयजयार्थ त्या वारणीं ? । । । ।

अर्थ: नम्र झालेल्या भक्तांचें रक्षण करण्याचें ब्रीद ज्यानें स्वीकारलें आहे,
अशा प्रभो, तूंच दुःखरुपी रानाचा त्याला जाळून भस्म करणारा वणवा
आहेस. तुझ्या चरणापाशीं शरण आलेल्यांच्या संकटकाळीं साहाय्यार्थ
धावणें करण्यांत तूंच अत्यंत वेगवान आहेस. त्या पुराणप्रसिद्ध गजेन्द्रनामक
हत्तीकरितां, त्या सती द्रौपदीवरील किटाळाचें निवारण करण्याकरितां,
किंवा त्या भारतीयुद्धांत अर्जुनाच्या विजयाकरितां, कोण बरें स्पष्ट दया
दाखविता झाला तें सांग पाहूं. हे परमेश्र्वरा, तूंच नाहीं का ती दाखविलीस ?

सुपात्र न रमाहि यद्रतिसुखास, दारा परी, ।
असा प्रभुहि सेवकां भजसि खासदारापरी; ।
प्रियाकुचतटीं जिंहीं न बहुवार पत्रावळी. ।
तिंहीं अमित काढिल्या नृपमखांत पत्रावळी. । । ७ । ।

अर्थ: लक्ष्मी प्रत्यक्ष पत्नी खरी, परंतु तिलाही ज्याच्या नाजुक प्रेमसुखाची
जोड लाभण्याइतकी श्रेष्ठ योग्यता नाहीं, तो तूं सर्वैश्र्वर्यसंपन्न परमेश्र्वर
आपल्या अर्जुनासारख्या प्रेमळ व एकनिष्ठ दासांची, मोतद्दार होऊन चाकरी
करतोस॰ आपल्या आवडत्या स्त्रीजनाच्या वक्षःस्थळावर रंगीबेरंगी उट्यांची
नक्षी काढण्याकरितांही जे तुमचे हात फारसे भागले नाहींत, त्यानींच
धर्मराजाच्या राजसूययज्ञांत ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळी काढण्याची
कामगिरी बजावली. तेव्हां, यावरून तुला आपले भक्त अतिप्रिय आहेत;
ते प्रत्यक्ष रमेपेक्षांही अधिक आवडते आहेत, हें उघडच सिद्ध होतें.

न पावसी, म्हणोनि मी म्हणतसें तुला आळशी; ।
बरी न असदुक्ति, हे, रविसखोत्थिता आळशी; ।
असंख्य जन तर्पिले, क्षुधित एकला जेमनीं ।
चुकेल, तरी त्यास दे, परि वदान्य लाजे मनीं. । । ८ ।

अर्थ: तेव्हां, इतका पराक्रमी भक्तवत्सल असतांही तूं मला अजून प्रसन्न होत
नाहींस; म्हणून मी तुला "आळ्शी" म्हणतों; परंतु, सूर्याचा मित्र जो सत्राजित
त्यानें स्यमन्तक मण्याच्या चोरीचा तुमच्यावर जो आळ घातला होता,
त्याप्रमाणेंच हां आळशीपणाचा
खोटा आरोप तुमच्यावर करणें योग्य नाहीं,
असें विचारान्ती वाटतें; कारण, माझें जरी तुम्हीं तारण केलें नाहीं, तरी
इतर असंख्य जनांचा उद्धार केला आहे. तेव्हां तुम्हीं आळशी खास नाहीं,
तर मी तुमच्या नजरेस अजून
पडलों नसावा, असें संभवतें. परंतु
हा संभवही तुम्हांला भूषणावह
आहे असें नाहीं. कारण एकाद्या उदार
दात्यानें असंख्य लोकांना जेवण घालून संतुष्ट करावें, पण एकटाच
कोणी भुकेला चुकून जेवायचा राहावा, आणि मग तो उमगून आला म्हणजे
दाता त्यालाही अन्न देतोच; परंतु दुर्लक्ष्याने घडलेल्या चुकीची रुखरुख
लागून तो मनांत खट्टू झाल्यावांचून राहत नाही. तेव्हां माझा उद्धार तुम्ही
वेळींच न करितां, अतिकाळ झाल्यावर केलात, तर तुम्हांलाही मनांत
खट्टू व्हावें लागेलच की नाहीं?


अगा प्रणतवत्सला ! म्हणति त्या जनां पावलां,
म्हणून तुमच्याच मी स्मरतसे सदा पावलां.
'करूं बरि कृपा, हरूं व्यसन, दीन हा तापला'
असें मनिं धरा; खरा भरंवसा मला आपला.

अर्थ: हे भक्तवत्सल प्रभो, त्या मागें उल्लेखिलेल्या जनांना तुम्हीं तारिलें,
असें, पुराणेतिहास लिहिणारे सांगतात, म्हणून मोठ्या विश्र्वासानें व
आवेशानें मी तुमच्या चरणांचें निरंतर ध्यान करितों. तेव्हां तुम्हींही
आपल्या मनांत असें आणावें, कीं, ' हा खरोखरच फार गांजला आहे॰
म्हणून याच्यावर आम्ही प्रसाद करूंच व याचें संकट निवारूंच॰ '
कारण माझा सर्व आधार खरोखर तुम्हीच आहां.

मला निरखितां भवच्चरणकन्यका आपगा ।
म्हणे, ' अगइ ! ऐकिलेंहि न कधीं असें पाप, गा ! ' ।
कर श्रवणिं ठेविते, नुघडि नेत्र, घे भीतिला ।
न घालिन भिडेस मी, जरिहि कार्यलोभी, तिला. । । १ ० ।

अर्थ: माझा सर्व आधार तुम्ही एकटेच कसे आहां तें पहा. आपल्या पायापासून
निघालेली गंगानदी माझी पापमूर्ति पाहून चमकून म्हणते, " अगबाई ! तुझ्याएवढें
विलक्षण पाप आजपर्यन्त कधींही मीं ऐकिलेंही नाहीं रे ! मग प्रत्यक्ष पाहण्याचें
बोलायलाच नको. " असे घाबरेपणाचे उद्गार काढून ती कानावर हात ठेवते,
डोळेसुद्धां उघडीत नाहीं; भयंकर धास्तीच घेते. तेव्हां माझ्या पापदर्शनानें
तिची उडालेली ही त्रेधा
पाहून, उलट मलाच तिची कींव येत आहे॰, आणि म्हणून
मला जरी आपलें ऊद्धाराचें कार्य साधण्याची ओढ आहे॰, तरीही तिला भीड
घालण्याच्या भरीस मी पडणार नाहीं.

सुबोध केकावलि
कै. बाळकृष्ण अनंत भिडे
संपादित
केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
केकावलि ते