Monday, July 13, 2009

केकावलि ११ ते १५





केकावलि ११ ते १५
सदैव नमितां, जरी पद ललाट केलें किणें,
नसे इतर तारिता मज भवत्पदाब्जाविणें.
नता करुनि मुक्तही, म्हणसि, ' मी बुडालों रिणें ; '
अशा तुज जो भजे मनुज, धिक् तयाचें जिणें ! । । ११ । ।


अर्थ: आतां आपण म्हणाल, कीं, " गंगेनें एक तुझी निराशा केली,
पण इतर देवदेवता आहेत, त्यांना शरण जाऊन त्यांचा प्रसाद
मिळीव आपलें कार्य साधून घे." पण हे प्रभो, तोही प्रयोग मीं
करुन पाहिला आहे. त्याची कहाणी ऐका. सर्व देवदेवतांना नमस्कार
घालतां घालतां, घट्टयांनीं माझें कपाळ आपलें कायमचें ठाणें केले
आहे. पण माझा उद्धार झाल्याचें कांहींच लक्षण अनुभवास येत नाहीं.
म्हणून तुमच्या चरणकमलाशिवाय दुसरें कोणीही माझें तारण
करणारें नाहीं. हे परमेश्र्वरा, नम्र दासाला मोक्षाची मिरास देउन उलट,
"
मीच दासाच्या भक्तीच्या ऋणांत बुडालों आहें त्याची फेड कशी
होईल ती होवो ! असें तूं म्हणत असतोस. मग, अशा तुला
भक्तवत्सलाला जो माणूस भजणार नाहीं त्याच्या अभागी
जिण्याला धिक्कार असो !

पटुत्व सकलेंद्रियीं, मनुजता, सुवंशीं जनी, ।
द्विजत्वहि दिलें भलें, बहु अलभ्य जें कीं जनीं ; ।
यश:श्रवणकीर्तनीं रूचि दिली, तरी हां ' वरा ' ।
म्हणे ' अधिक द्याच कीं, ' अखिल याचकीं हावरा ! " । । । ।


अर्थ: हे प्रभो, कदाचित् तुम्हीं आपल्या मनांत म्हणाल कीं,
सर्व इंद्रियांच्या ठायीं चलाखपणा, मनुष्यत्व, उत्तम
कुळांत जन्म, आणि लोकांत जें अत्यंत दुर्मिळ गणलें
जाते तें बहुमोल ब्राह्मणत्वही, मी याला दिलें ; शिवाय,
माझीं पवित्र चरितें कण्याची स्वत: गाण्याची
गोडी-आवड -हा गुणही दिला. परंतु इतक्या मोठमोठ्या
देणग्या एकीमागून एक बहाल केल्या, तरीही मला आणखी
कांहीं तरी देणगी द्याच हो ! अशी याची टकळी चालूच आहे.
तेव्हां एकंदर मागणेकय्रांमध्यें हा बिलंदर लोभट आहे खरा !


असें न म्हणशील तूं , वरद वत्सल , श्रीकरा ! ।
परंतु मज भासलें, म्हणुनि जोडितों मी करां ; ।
दिलें बहु बरें खरें , परि गमे कृपा व्यंग ती. ।
अलंकृतिमती सती मनिं झुरे, न जों संगती.। । १ ३ । ।

अर्थ: वरच्यासारखे उद्गार कदाचित् तूं आपल्या मनांत काढशील,
असें क्षणभर भासलें, पण आतां मला खास वाटतें कीं, हे
लक्ष्मीनाथा, तूं उदार व कनवाळू असल्यामुळें असें कधींही
म्हणणार नाहींस ; परंतु, 'कदाचित् तूं असें म्हणशील,' असें
मला क्षणमात्रच का होईना, पण भासले, हा मोठाच अपराध
माझ्या हातून घडला म्हणून मी हात जोडून तुमची क्षमा
याचितों. महाराज, आपण मला पुष्कळ देणग्या दिल्या आहेत,
हें अगदीं खरें आहे, परंतु हा एवढा प्रसादही मला उणाच वाटतो;
कारण, असें पहा, एकादी पतिव्रता दागदागिन्यांनीं कितीही
नटविली, तरी जोंपर्यंत तिला पतीचा सहवास लाभला नाहीं,
तोंपर्यंत ती आपल्या मनांत झुरतच राहणार॰

कराल पुरती दया , तरि असो दिलें पावलें ; ।
परंतु, हरि ! एकदा त्वरित दाखवा पावलें ; ।
प्रसाद करणें मनीं जरि नसेल, हें आवारा ; ।
जया बहु, तयास द्या ; मज कशास ? मी हावरा ! । । १ ४ । ।

अर्थ: हे प्रभो , तुम्ही माझ्यावर जर पुरती दया करणार
असाल तरच या दिलेल्या सर्व देणग्या खरोखर मला पोंचल्या
असें होऊन त्यांचें चीज होईल॰ पण, हे हरे, जर पूर्ण दया केव्हां
तरी करण्याचे तुमच्या मनांत असेल, तर तुमच्या पायांचें दर्शन
शक्य तितक्या लवकर होऊं द्या. आणि अशी परम कृपा करण्याचें
तुमच्या मनांतच नसेल, तर या दिलेल्या देणग्यांत कांहींच तथ्य नाहीं,
या देणग्या तुम्ही आपल्या खुशाल परत घ्या, व त्या ज्याला बहुमोल
वाटत असतील, त्याला द्या. मला या कशाला देतां ? मी तर बोलून चालून
हावराच आहें. आणि म्हणून माझें समाधान एवढ्यानेंच कदापि
व्हावयाचें नाहीं.

' दिलें फिरूनि घेतलें, ' अशि अकीर्ति लोकीं न हो ; ।
सुनिर्मळ तुझीं पदें कधिं तरी विलोकीन, हो ! ।
निजप्रियजनांकडे तरिहि देहवाला ; जशी ।
पडेल समजाविशी, तशि करोत ; कां लाजशी ? । । १ ५ । ।

अर्थ: ' दिलेलें दान परत घ्या , ' असें मीं तुम्हांला सांगितलें खरें,
परंतु दात्याला तसें करणें फार लाजीरवाणें आहे. म्हणून
' दिलेलें दान परत घेतलें, ' असा तुमचा लोकांत दुर्लौकिक
होणें कांहीं इष्ट नाहीं. माझें काय, आज नाहीं, उद्यां, किंवा
केव्हां तरी मला तुमच्या अत्यंत शुद्ध चरणांचें दर्शन घडणारच
आहे. पण, आतां इतकें तरी करा, कीं माझें तारण करण्याची
कामगिरी तुम्ही आपल्या आवडत्या साधुसंतांकडे सोंपवून
द्या ; मग ते माझी जुळेल तशी समजूत घालोत, तें मला
सर्वस्वी मान्य आहे ; अशी व्यवस्था करण्यांत तुम्हांला लाज
वाटण्याचें काय कारण आहे?

सुबोध केकावलि
कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव भिकाजी ढवळे प्रकाशन