Tuesday, July 28, 2009

केकावलि २१ ते २५


Kekavli 21 to 25

केकावलि २१ ते २५
कळी करि सुनिर्मळीं परम उग्र दावा नळीं ,
तयांत अविशुद्ध मी, शलभ जेंवि दावानळीं ;
व्रणार्थ पशुच्या शिरावरी वनीं उभे काकसे
स्मरादि रिपु मन्मनीं; अहि काळ भेका कसे ? २१


अर्थ: अत्यंत शुद्ध अशा नळ राजाशीं कलीनें अत्यंत
भयंकर दुष्टावा मांडला ; आणि मी तर, अनेक पापांनीं
लडबडलेला असल्यामुळें, जसा वणव्यांत एकादा बारीकसा टोळ
सांपडावा, तसा या कलीच्या तडाक्यांत सांपडलों आहें.
गुराच्या डोक्यावर टोंचून क्षत पाडण्याकरितां
जसे कावळे
रानांत उभे असतात, त्याप्रमाणें मला टोंचून
व्यथा करण्यासाठीं कामक्रोध शत्रु माझ्या अन्तःकरणांत
सज्ज उभे आहेत. त्या भयंकर शत्रूंना पाहून माझा
थरकांपच होतो; आणि तो होणारच, कारण,
बेडकाला साप काळस्वरूप कसे होणार नाहींत?


तरेन तुमच्या बळें, भवमहानदीनाविका !
तुम्हीच मग आतरास्तव मला सुदीना विका ;
असे विदित वासही मज सदाश्रमींचा, करा
दया, गुण पहा ; सवे मज सदा श्रमीं चाकरा.


अर्थः मी जरी असा कामादि सहा शत्रूंच्या भीतीनें
गांगरलेला आहें तरी, हे संसाररूपी अफाट नदींतील
नावाड़या परमेश्र्वरा ! तुमच्या आधारानें मी संसारनदीपार
तरून जाईन, आणि मग या भिकाय्राचा उताराच्या
रकमेकरितां तुम्हीच विक्रय करून टाका. मी जरी
निर्धन भिकारी आहें, तरी माझ्या गुणानें मला किंमत येईल.
मला सज्जनाच्या घरांत राहून कसें वावरावें हें ठाऊक आहें
माझ्यावर दया करा माझ्या गुणांचा अनुभव घ्या.
मला-नोकराला कष्ट करण्याची नेहमींच संवय आहे.
तेव्हां माझ्याकडून कामचुकारपणा कधींही होणार नाहीं.


धना, परिजना, घरीं तुमचिया उणें कायसें ?

लाभ मणिहेमभूपतिस जोडिल्या आयसें ;
परि प्रभुहि संग्रहीं सकल वस्तुंला ठेविती,
गुणा म्हणतां उणाअधिक, आदरें सेविती.


अर्थः कदाचित् तुम्हीं म्हणाल, कीं, ' मला तुला
विकून द्रव्य मिळविण्याची जरूरी नाहीं; तुझ्या
चाकरीचीही गरज नाहीं. ' तुम्ही असें म्हणालां तर
तें कांहीं खोटें नाहीं. कारण तुमच्या घरांत द्रव्याला
सेवकांना काय तोटा आहे ? वाटेला तेवढें द्रव्य
लागतील तेवढे सेवक तुमच्याजवळ आहेत,
आणि जो रत्नांचा, सोन्याचा पृथ्वीचा स्वामी आहे,
त्याला लोखंडाची जोड करून काय लाभ बरें ?
हेंही खरें. परंतु आपण ध्यानीं आणा, कीं, समर्थ
श्रीमंत झाले, तरी तेही लहान मोठ्या सर्व
वस्तु आपल्या संग्रहीं ठेवितात, वस्तूच्या गुणाला
कमीअधिक म्हणतां, तिचा आस्थेनें स्वीकार करितात


दिसें, म्हणुनि शाश्र्वतप्रकृति रंक मी काय ? हो ! ।
प्रसन्न तुमचा बरें मजवरी, प्रभो, पाय हो। ।
क्षण त्यजुनि इंदिराबृहदुरोजसंगा, धरा। ।
शिरीं पद, मिळो सखा-सम-सुशील गंगाधरा. । । । ।


अर्थः शिवाय, माझा बावळा दीन चेहरा पाहून तुम्ही
मला
हीन समजत असाल. पण या देखाव्यानें भ्रमूं
नका
. अहो, मी असा दीन दिसतों म्हणून मी नेहमींच
कायमचा भणंग राहणार आहें कीं काय? हे प्रभो !
तुमचा
पाय माझ्यावर एकदां प्रसाद करुं द्या बरें,
म्हणजे
पहा काय चमत्कार होईल तो ! लक्ष्मीच्या
भरदार
वक्षःस्थळावरून एक पळभरच तुम्ही आपला
पाय
काढून माझ्या मस्तकावर ठेवा, कीं तत्क्षणींच
त्या
गंगाधर शंकराला मी सुशीलानें अगदीं त्याच्याचसारखा
असा
सोबती लाभेन ! शंकरांत माझ्यांत कोणतेंच
अंतर
राहणार नाहीं

'' प्रभुस्तुति ठाउकी, परी तिच्या महाकामुका
मला कृपण मारितो बहु सकाम हाका मुका, '' ।
म्हणां मनिं असें ; कसें प्रथम नीट ये लेंकरा ?।
हळुहळु पटु स्वयें सुपथिं लावियेलें करा. । । । ।


अर्थः मी आतांपर्यँत जें बोललों, ती खरी स्तुति नाहीं,
तर
कांहीं तरी बखवा आहे असें तुम्हांस वाटत
असेल
, तुम्ही मनांत म्हणत असाल, कीं,
"
याला थोरामोठ्याचें स्तवन कसें करावें तें ठाऊक
नाहीं, परंतु मला स्तुतिप्रिय पाहून, हां एक दुबळा,
अनाथ
, बोबडा जीव, स्तुति करण्याची मोठी हांव मनांत
धरून
माझ्या नांवानें कशा तरी किंकाळ्या फ़ोडीत आहे।"
तुमचें हें म्हणणें खरें आहे, हें मी कबूल करितों,
परंतु
लहान मुलाला एकदम पहिल्याप्रथमच कोणतेंही
काम
नीट कसें करतां येईल? त्याला तुम्ही स्वतःच थोडेथोडें
शिकवून
हुषार करा चांगल्या पद्धतीचा माहितगार करा
म्हणजे मग हाच उत्तम स्तुतिगायक होईल

सुबोध केकावलि
संपादक कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव भिकाजी ढवळे, प्रकाशन