Sunday, July 19, 2009

केकावलि १६ ते २०



केकावलि १६ ते २०

अहा ! निपट धृष्ट मी प्रभुवरासि ' कां लाजशी ? ' ।
म्हणें ! तुज नसो तशी विकृति, भाविकाला जशी. ।
परंतु अपराध हा गुरु, म्हणोनि शिक्षा करीं; ।
असेचि धरिली नयच्युतदमार्थ दीक्षा करीं. । । १ ६ । ।

अर्थ: अरेरे ! मीं कमालीचा उद्धट होऊन त्या जगन्नियन्त्या
परमेश्र्वराचीही लाज काढिली ! परंतु कातावून
विकारवश
झालेला भक्त उद्धट बनला, तरी ( हे दयामय प्रभो,) तूं मात्र
विकारवशतेनें क्रोधाविष्ट होऊं नयेस. तरी पण माझ्या हातून
फारच मोठा -अक्षम्य अपराध घडला आहे. म्हणून दया बाजूस
सारुन मला शिक्षा कराच ; आणि असें करणें तुमचें कर्तव्यच
आहे, कारण, नीतिमर्यादा सोडून स्वैर वृत्तीनें वागणाय्रांचें पारिपत्य
करण्याचें कंकणच तुम्हीं हातीं बांधिलें आहे.

सदैव अपराध हे रचितसें असे कोटि, गा ! ।
स्वयेंहि कथितों, नसे तिळहि लाज, मी कोटिगा ; ।
अजांडशतकोटि ज्या उदरिं सर्वदा नांदवा, ।
न त्यांत अवकाश या, स्थळ दिलें तदा कां दवा ? । । १ ७ । ।

अर्थ: अहो, मी अशा प्रकारचे क्रोडोगणती अपराध नेहमींच
करतों ; आणि त्यांची स्वत:च आपल्या तोंडानें कबुली
देतों ; व असें करतांना तिळभरही लाजत नाहीं ; तेव्हां
एकंदरींत मी पक्का कोडगा आहें, हेंच खरें. पण अशा
प्रकारें कोडगेपणाचा जरी मी अगदीं अर्क असलों, तरी,
ज्या आपल्या विशाळ पोटांत ब्रह्माण्डांच्या शेंकडों कोटि
सहज सामावतात, त्या पोटांत माझ्या अपराधाच्या या
कोटि घालण्यास जागा नसेल तर मग त्या कृष्णावतारांतील
दावाग्नीला आपण जेव्हां गिळलात, तेव्हां त्याला कशी
बरें जागा करुन दिलीत ?

तुझ्या जिरविले बहु प्रणतमंतु पोटें ; पण ।
त्यजी मदपराध हें ; मजकडेचि खोटेपण ; ।
दवाग्नि जठरीं
अतिक्षुधित, त्यास हें अन्न द्या ; ।
वितृष्ण करिती श्रितां तुमचिया दयासन्नद्या.। । १ ८ । ।

अर्थ: तुझ्या या पोटानें आजपर्यंत शरण आलेल्या दासांचे
पुष्कळ अपराध गिळून पचविले आहेत ; परंतु हें
पोट आज माझेच तेवढे अपराध गिळ्ण्याचें; नाकारतें ;
तेव्हां माझ्या स्वत:च्या ठिकाणींच कांहीं तरी गोम
असली पाहिजे. पण मी आतां एक युक्ति सुचवितों,
ती ही, कीं, जर माझे जड अपराध तुमच्या पोटाला
पचत नसतील, तर तुमच्या पोटांत जो प्रखर
वखवखलेला दावाग्नि आहे, त्याला या माझ्या
अपराधांची अन्नाहुति द्या. ही युक्ति केवळ माझ्या
कार्यसाधूपणाची आहे असें नाहीं, तर ती तुमच्या
स्वभावासही साजेशीच आहे.
कारण, हां दावाग्नि
आतां तुमचा आश्रित झाला आहे, आणि आश्रितांची
तहानभूक भागवून त्यांस तृप्त करणें, हें तुमच्या
दयारसाच्या पवित्र नद्यांचें शीलच आहे.

न होय कवणाहि, तें तुमचियाचि लीलालसें ।
पदें चरित दाविजे त्रिजगदब्जकीलालसें; ।
मदुद्धरण मात्र कां जड तुम्हां दिसे ? वारिती ।
स्वकव्यसन मर्त्यही, न करितीच सेवा रिती. । । १ ९ । ।

अर्थ: पाणी जसें कमळाला सांवरून धरतें, तसें सर्व
त्रिभुवनाला सांवरून धरण्याचें जें कार्य कोणालाही
करितां येणार नाहीं, तेंच अचाट कार्य तुझा चरण अगदीं
सहजासहजीं-विशेषसे सायास न करितां-पार पाडतो ;
मग माझा उद्धार करण्याचें मात्र तुम्हांला अवजड भासावें
काय ? अहो, सामान्य माणसेंसुद्धां आपल्या आश्रितांची
संकटबाधा दूर करितात, आणि त्यांनीं केलेली चाकरी
निष्फ़ळ होऊं देत नाहींत. तेव्हां माझें संकट वारणें
हें तुम्हां प्रभुवरांना भूषणावह आहे ; शिवाय, मी
आजपर्यंत केलेल्या भक्तीचा तो योग्य मोबदालाही
आहे.

दयाब्द वळशील तूं तरी न चातकां सेवकां ।
उणें किमपि ; भाविकां उबगशील तूं देव कां ।
अनन्यगतिकां जनां निरखितांचि सोपद्रवा, ।
तुझेंचि, करुणार्णवा मन धरी उमोप द्रवा. । । २ ० । ।

अर्थ: हे प्रभो, तूं दयारसाचा मेघ जर अनुकूल होऊन
इकडे वळलास, तर मग भक्तरूपी चातकांना कसलीही वाण
राहणार नाहीं, कारण, मग त्या चातकांप्रमाणें प्रसादाकरितां
तान्हेलेल्या भक्तांना पाहूनही तूं वैभवशाली प्रभु आपल्या
भोळ्या श्रद्धाळू भक्तांचा कंटाळा करशील हें शक्य तरी आहे
काय ? हे दयासागरा, ज्यांना तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही
आधार नाहीं, अशा दु:खपीडित लोकांना पाहतांक्षणींच, तुझ्याच
मनाला कळवळ्याचा अपरंपार पाझर फुटतो।


सुबोध केकावलि
संपादक
कै. बाळकृष्ण अनंत भिडे
केशव
भिकाजी ढवळे, प्रकाशन